
जळगाव मिरर | ३० मार्च २०२६
भरधाव डंपरने धडक देत चिरडल्याने बशीरशा मकबूलशा शाह फकीर (वय ७५, रा. वराड, ता. जळगाव) हे जागीच ठार झाले. ही घटना दि. २८ मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील वराड येथे घडली. अपघात होताच ग्रामस्थांनी वाळू वाहतुकीविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला. एमआयडीसी पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला. या प्रकरणी चालक नितीन वसंत मिस्तरी (रा. दोपोरे, ता. एरंडोल) व मालक भूषण सुधाकर चव्हाण (रा. धानोरा, ता. जळगाव) या दोघांना अटक करण्यात आले असून दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वराड येथील बशीरशा फकीर हे कामानिमित्त गावातील बसस्थानकाकडे गेले होते. त्या वेळी वाळू वाहतुक करणारा (एमएच ४७, एएस ५१४८) क्रमांकाच्या डंपरने जोरदार धडक दिल्याने वृद्ध डंपरखाली चिरडल्या गेले. वृद्धास शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी डंपर ताब्यात घेत पोलिस ठाण्यात जमा केले. या प्रकरणी डंपरचालक नितीन मिस्तरी व मालक भूषण चव्हाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आले आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पढील तपास सहायक निरीक्षक गणेश वाघ करीत आहेत.
अपघात होताच गावातील नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. भरधाव डंपरचा बंदोबस्त झालाच पाहिजे, अशी मागणी केली. या वेळी अनेक जण आक्रमक झाले होते. मात्र पोलिसांनी त्यांची समजूत काढत संबंधितांवर कारवाईची ग्वाही दिल्यानंतर ग्रामस्थांनी अडवून ठेवलेला डंपर पोलीस ठाण्यात नेण्यासाठी मार्ग मोकळा करुन दिला





















