जळगाव मिरर | संदीप महाले
जळगाव महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून यंदाच्या निवडणुकीत एका मोठ्या राजकीय पक्षात उमेदवारीवरून अंतर्गत अस्वस्थता वाढताना दिसत आहे. पक्षातील दिग्गज नेते, मंत्री व आमदारांचे नातेवाईक तसेच सेवेकरी म्हणून ओळखले जाणारे खाजगी स्वीय सहाय्यक, चालक आणि त्यांच्या निकटवर्तीयांसाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात येत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. मात्र, त्याच पक्षातील अनेक निष्ठावंत व जुने कार्यकर्ते अद्याप उमेदवारीच्या प्रतीक्षेत असल्याने नाराजीचा सूर ऐकू येत आहे.
शहरातील काही प्रभागांमध्ये दिग्गज नेत्यांच्या ‘खास’ व्यक्तींचा प्रचार आधीच सुरू झाला असून, कॉर्नर बैठका, संपर्क दौरे आणि मतदारांशी संवादाचे कार्यक्रम राबविले जात आहेत. या बैठकीत संबंधित इच्छुक उमेदवारांकडून “मी मत मागायला नव्हे, तर मत मांडायला आलो आहे” असा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात उमेदवारी मिळविण्याच्या तयारीनेच हे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे संबंधित इच्छुक उमेदवार जळगाव शहरात अवघ्या दहा वर्षांपूर्वी स्थायिक झाला असून, कोणत्याही प्रभागात त्याचा ठोस जनसंपर्क किंवा प्रभाव नसल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तरीही “मी पक्षातील दिग्गज नेत्यांच्या जवळचा आहे” या एकाच भांडवलावर उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
दरम्यान, अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणारे, निवडणुका, आंदोलने आणि संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडणारे निष्ठावंत कार्यकर्ते मात्र अद्याप डावलले जात असल्याची भावना व्यक्त करत आहेत. यामुळे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पक्षांतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम निवडणूक प्रचारावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
निष्ठा की नातेसंबंध? कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
जळगाव मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका मोठ्या पक्षात निष्ठा की नातेसंबंध या मुद्द्यावरून चर्चा सुरू झाली आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते उमेदवारीपासून दूर राहिल्यास त्यांचा उत्साह मावळण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम पक्षाच्या संघटनशक्तीवर होऊ शकतो, असा इशारा काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे. वरिष्ठ नेतृत्व यावर कोणता तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





















