जळगाव मिरर | २२ मार्च २०२४
राज्यातील अनेक शहरात मुलीसह महिलावर अत्याचार व विनयभंग केल्याच्या घटना नियमित घडत असतांना एक संतापजनक घटना मुंबईतील खेरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. वडिलांचा भविष्य निर्वाहनिधी अर्थात ईपीएफ काढून देतो. माझी शरीरसुखाची मागणी पूर्ण कर, अशा आशयाचा मॅसेज एका नामांकित कंपनीच्या एचआर मॅनेजरने २३ वर्षीय तरुणीला पाठवला. मॅसेज पाहून तरुणीला धक्काच बसला. तिने तातडीने पोलिसांत धाव घेत HR मॅनेजरविरोधात तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित HR मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. सुशांत असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी एका गरीब कुटुंबातील असून घरकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तरुणीचे वडील माझगाव येथील एका कंपनीत काम करत होते. ती १५ वर्षांची असताना २०१५ मध्ये तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. दरम्यान, वडिलांच्या पगारातून कापलेल्या ईपीएफची रक्कम मिळावी म्हणून तरुणीने ऑफिसमध्ये अर्ज दाखल केला.
मात्र, ५ वर्ष पाठपुरवठा करूनही तिला पीएफचे पैसे मिळाले नाहीत. जेव्हा तरुणीने कंपनीच्या HR मॅनेजर सुशांत सोबत संपर्क साधला, तेव्हा त्याने तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. इतकंच नाही, तर तुझ्या वडिलांच्या पीएफचे पैसे काढून देतो, फक्त माझी शरीरसंबंधाची इच्छा पूर्ण अशी मागणी आरोपी सुशांतने तरुणीकडे केली. याप्रकरणी तरुणीने पोलिसांत धाव घेत आरोपी सुशांतविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.