जळगाव मिरर | १८ डिसेंबर २०२४
धरणगाव तालुक्यातील साळवा येथे मुलगी पाहण्यासाठी जाणाऱ्या तरुणाला चार अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना नांदेड फाट्यावर १५ रोजी घडली. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यामधील सेंधवा तालुक्यातील झापडमल्ली येथील मजूर भागीराम कुवरसिंग बारेला (वय १९) हा चोपडा तालुक्यातील धनवाडी येथील लीलाधर भिका चौधरी यांच्या शेतात राहतो. भागीराम बारेला हा तरुण चोपडा येथून साळवा येथे लग्नासाठी मुलगी पाहण्याकरीता दुचाकीवरून जात होता. त्याच्या पुढे मावशी आणि मावसा हे देखील दुचाकीवरून जात होते.
नांदेड फाट्याजवळ त्याच्या मागाहून दोन जण दुचाकीवरुन आले. त्या चौघांनी भागीराम बारेला याला थांबवले. यात चौघा चोरट्यांपैकी दोघांच्या तोंडाला रुमाल बांधलेले होते. चोरट्यांनी भागीराम बारेला याच्याकडून मोबाईल, दुचाकी आणि ५०० रुपये रोख असा एकूण २५ हजार ५०० रुपयाची रोकड हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चौघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. पवन देसले यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. नीलेश वाघ करत आहेत.