
जळगाव मिरर | १० मे २०२५
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव असून दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याबद्दल कौतुक करणारी पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे या चांगल्याच संतापल्या आहेत. भाजपने हा चिल्लरपणा बंद करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील यावरून प्रश्न विचारले आहेत.
या संदर्भात केलेल्या एका पोस्टच्या माध्यमातून रोहिणी खडसे यांनी भारतीय जनता पक्ष राजकारण करत असल्याची टीका केली आहे. याचा परिणाम देशाच्या एकजुटीवर या शिवाय भारतीय सैन्याच्या मनोबलावर देखील होईल, असे देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आपल्या 40 पैसेवाल्यांना सांगा की, असल्या पोस्ट बंद करा, असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.
चिल्लरपणा बंद करा – रोहिणी खडसे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी भाजपच्या एका पोस्टला प्रत्युत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले आहेत. यामध्ये त्यांनी म्हटले की, मा. नरेंद्र मोदी जी, भाजप हे जे काही करत आहे ते आपल्याला पटते आहे का ? देश संकटात असताना सर्व जण पक्ष, राजकारण बाजूला ठेवून एकसंध उभे आहेत. हे भाजपला बघवत नाही का ? भारतीय सैन्याचे जवान आपल्या प्राणांची बाजी लावून पाकिस्तान विरोधात लढत आहेत. अशा परिस्थितीत भाजप असे राजकारण करत असेल तर याने देशाच्या एकजुटीवर फरक तर पडेलच शिवाय सैन्याच्या मनोबलावरही परिणाम होईल. त्यामुळे आपल्या ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा. असे आवाहन रोहिणी खडसे यांनी केले आहे.