
जळगाव मिरर | ३० मार्च २०२६
राज्यात इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असून, मंत्री स्तरावरूनच मागणी झाल्याने सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इराण-अमेरिका-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विस्कळीत झाल्याचा परिणाम महाराष्ट्रात जाणवत असल्याचा दावा केला जात आहे.
रविवारी राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहून जैन मंदिरांसाठी गॅस सिलिंडर्सची मागणी केली. या पत्रामुळे राज्यात गॅस टंचाई नसल्याचा सरकारचा दावा कमकुवत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “गेल्या १०-१५ दिवसांपासून राज्यात गॅस सिलिंडरची मोठी टंचाई असल्याचे आम्ही सांगत आहोत. मात्र सरकारकडून सातत्याने त्याचा इन्कार केला जात आहे.” खडसे यांनी पुढे सांगितले की, “दोन दिवसांपूर्वी एका वृद्ध माजी सरपंचाचा सिलिंडरच्या रांगेत मृत्यू झाला, तरीही सत्ताधारी ‘कुठे आहे टंचाई?’ असे म्हणत आहेत. आता मंत्री लोढा यांनीच सिलिंडर्सची मागणी करून या तुटवड्याची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे.” लोढा यांच्या पत्राचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, “जैन मंदिरांना प्रत्येकी पाच सिलिंडर देण्याची मागणी करून त्यांनी सरकारच्या डोळ्यात अंजन घातले आहे. यामुळे राज्यात गॅसची गंभीर टंचाई असल्याचे स्पष्ट झाले आहे.”
दरम्यान, राज्य सरकारकडून मात्र गॅस टंचाई नसल्याचा दावा कायम ठेवण्यात येत आहे. तरीही वाढती मागणी, वितरणातील अडचणी आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची स्थिती आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढांचे गॅसची मागणी करणारे पत्र व्हायरल
मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, चैत्र महिन्यात एकदाच येणाऱ्या ओली आयंबील हा जैन धर्मातील एक महत्त्वाचा सन आहे. या दिवशी उपवास, पूजा व विशेष धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पाडले जातात. या निमित्ताने मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंबिल (पारंपरिक पेय) तयार करून भक्तांना वितरण केले जाते.
माझ्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील 16 जैन मंदिरांमध्ये ओली (अंबिल) निमित्त मोठ्या प्रमाणावर व्यवस्था केली जाते. यासाठी प्रत्येक मंदिरास 5 गॅस सिलिंडरची आवश्यकता आहे. सबब, आपणास नम्र विनंती आहे की, या 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 सिलिंडर उपलब्ध करून देण्यास सहकार्य करावे. जैन धर्मीय समाज आपल्याकडून या बाबतीत सकारात्मक मदतीची अपेक्षा ठेवून आहे. आपल्या सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी राहू.





















