जळगाव मिरर | ६ जून २०२५
राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षापासून ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी अनेक नेते प्रयत्न करीत होते आता गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यावर राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी दोन्ही भावांनी एकत्र येण्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे या चर्चांना आता आणखी जोर मिळत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार )आमदार रोहित पवार यांनी आज एक ट्विट केले त्यातून त्यांनी एक सूचक वाक्य केले आहे.
रोहित पवार यांनी आज शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देताना राज्यात सुरु असणाऱ्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या पार्श्वभूमीवर एक ट्विट केल्याचे दिसत आहे. यामध्ये त्यांनी “शेवटी मराठी माणसाची एकजूट” असे म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावर आपली सूचक प्रतिक्रियाच दिल्याचे दिसत आहे. त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये पुढे,”महाराष्ट्र धर्माची बूज, प्रतिष्ठा, सन्मान राखणं महत्वाचं आहे” असे म्हटले आहे. त्यामुळे या ट्विटच्या माध्यमातून नेमकं त्यांना काय म्हणायचं येत्या काळात दिसून येईल.
दरम्यान , मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकत्र येण्याविषयी संकेत दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एका जाहीर कार्यक्रमांमध्ये एकत्र येण्याचे संकेत दिले. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव आणि राज एकत्र येणार याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र, अजूनही याबाबत स्पष्टता मात्र आलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये दोन भावांच्या मनोबिलनाची चर्चा जोरदार सुरू आहे. इतकेच नव्हे तर या दोन भावांनी एकत्र यावे अशी महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाची सुद्धा भावना आहे. मात्र, पुढाकार कोण घेणार याबाबत मात्र अजूनही स्पष्टता आलेली नाही. या चर्चांवर दोन्ही आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही ठाकरे एकत्र येणार का?हे येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे.




















