जळगाव मिरर | ९ जुलै २०२५
राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड एका वादग्रस्त विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अशातच आमदार निवासात काल रात्री ८ जुलै मंगळवार मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून, गायकवाड हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
शिळ्या आणि वास येणाऱ्या जेवणाच्या कारणावरुन आमदार संजय गायकवाड यांनी कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कँन्टीनमध्ये दिली गेलेली डाळ शिळी आणि वास येणारी होती, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. याबाबत त्यांचा कँन्टीन व्यवस्थापकाशी वाद झाला, हा वाद काही क्षणातच विकोपाला गेला आणि गायकवाड यांनी थेट कर्मचाऱ्याला मारहाण केली.
आमदार निवासासारख्या उच्चस्तरीय ठिकाणी अशी घटना घडल्याने कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच आमदारांमध्येही अवस्थता पसरली आहे. या प्रकरणाची माहिती आकाशवाणी आमदार निवास प्रशासनाला देण्यात आली आहे. सोशल मीडियावर आमदार संजय गायकवाड यांचा कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, याची जोरदार चर्चा होत आहे. त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
कँन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत ते प्रशासनाला जाब विचारणार आहेत. तसेच विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणावरून विधानसभेही गोंधळ होण्याची शक्यता आहे. गायकवाड हे अनेकदा त्यांनी केलेल्या विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आता पुन्हा एकदा मारहाण केल्याचे प्रकरण समोर आल्याने त्यांच्यावर टीकाही केली जात आहे.
