जळगाव मिरर | ८ फेब्रुवारी २०२५
दिल्ली विधानसभा निवडणुकीची निकालाकडे देशातील जनतेचे लक्ष लागून आहे. तर आज शनिवारी मतमोजणी सुरु झाली असून ७० विधानसभेच्या जागांपैकी ३६ जागा बहुमतासाठी गरजेच्या आहेत. सुरुवातीच्या कलानुसार, भाजपने ४९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर आम आदमी पक्ष २० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसने केवळ एका जागेवर आघाडी घेतली आहे.
निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या कलांनुसार, भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. येथून भाजपचे प्रवेश वर्मा आघाडीवर आहेत. त्याचबरोबर जंगपुरा येथून माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि कालकाजी येथून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी देखील पिछाडीवर पडल्या आहेत. दिल्ली कँट येथून भाजपचे भुवन तंवर आघाडीवर आहेत.
जनकपुरी येथून आपचे उमेदवार प्रवीण कुमार आघाडीवर आहेत. करावल नगर येथून भाजपचे कपिल मिश्रा यांनी आघाडी घेतली आहे.
विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला हॅट्ट्रिक साधता येणार नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढलेल्या भाजपला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मागच्या दशकभरापासून एकही आमदार नसलेल्या काँग्रेस पक्षालाही दिल्लीत खाते उघडता येईल, असा अंदाजही एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला. राजधानी दिल्लीमध्ये अडीच दशकांपासून भाजप सत्तेपासून दूर आहे. भाजपचा सत्तेचा हा दुष्काळ या निवडणुकीत दूर होईल, अशी शक्यता एक्झिट पोलच्या अंदाजांमध्ये वर्तवण्यात आली होती.