
जळगाव मिरर | ३० मार्च २०२६
फैजपूर शहरातील पोलीस ठाण्यातच पोलिस कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (सकाळी सुमारे ११:३० वाजता) घडली. या प्रकरणी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे काही काळ पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, भूषण प्रमोद भिरूड (वय २६) आणि धीरज विजय सोनवणे (वय २५) हे गुटखा खात पोलीस ठाण्यातील अंमलदाराच्या कक्षात गेले. या वेळी त्यांनी कक्षातच गुटखा थुंकल्याचे निदर्शनास आले. याबाबत उपस्थित पोलिसांनी त्यांना जाब विचारला असता, दोघांनी संताप व्यक्त करत वाद घालण्यास सुरुवात केली.
वाद वाढत जाऊन दोघांनी एका पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून त्याच्याशी धक्काबुक्की केली. तसेच, त्यांनी शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी हवालदार रुपेश पाटील यांच्या फिर्यादीवरून संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रशीद तडवी करीत आहेत.





















