जळगाव मिरर | २७ ऑगस्ट २०२६
अमळनेर तालुक्यातील खवशी येथे तलावात बुडून १० वर्षीय मुलासह त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी घडली. मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या वडिलांचाही बुडून मृत्यू झाल्याने तलवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्र अण्णा तलवारे (वय १०) हा तलावात गेला असता तो पाण्यात बुडू लागला. मुलाला बुडताना पाहून त्याचे वडील अण्णा एकनाथ तलवारे यांनी त्याला वाचविण्यासाठी तलावात धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने या प्रयत्नात दोघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
नागरिकांच्या मदतीने दोघांना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेची माहिती परिसरात पसरताच खवशीसह परिसरात शोककळा पसरली. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही जीव गेल्याने या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.




















