जळगाव मिरर । २ डिसेंबर २०२५
अमळनेर तालुक्यातील एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका प्रेमी युगुलाने एकाच झाडाला एकाच दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. १ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास देवगाव देवळी येथे उघडकीस आली. दिनेश बद्री पावरा (वय २२, रा. हिंगोणे जळोद) व अश्विनी गोकुळ भिल (वय (वय १६) असे मयत झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील हिंगोणे जळोद येथे राहणारा दिनेश पावरा हा जळोद येथे वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर काम करत होता. तर अश्विनी ही देवगाव देवळी येथे मजुरी काम करत होती. देवळी येथील आयटीआय कॉलेज च्या मागे असलेल्या निंबाच्या झाडाला उंचावर एक युवक आणि युवती गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले दिसले.
देवळी येथील पोलीस पाटलांनी अमळनेर पोलीस स्टेशनला घटना कळवल्यावर डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोहेकॉ संतोष नागरे, उदय बोरसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करुन प्रेमीयुगांना ग्रामस्थांच्या मदतीने खाली उतरवून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू लावल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या दोघांचे प्रेमसंबंध असावे आणि त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना असून त्यानुसार पोलिसांकडून तपास केला जात आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस उप निरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.





















