जळगाव मिरर | ७ मार्च २०२५
गेल्या काही महिन्यापासून प्रेम प्रकरण व लग्नाच्या माध्यमातून अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना आता इचलकरंजी येथे पत्नी दुसरा विवाह करीत असल्याचे समजल्याने शेखर अर्जुन गायकवाड (वय 31, रा. करंबळ, ता. अकलूज, जि. सोलापूर) याने शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पेटलेल्या अवस्थेत गायकवाड हा पोलिस ठाण्याच्या आवारात धावू लागल्याने पोलिसांची त्याला वाचवताना चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. यात गायकवाड गंभीर जखमी झाला असून कोल्हापुरातील सीपीआरमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गायकवाड याला वाचवताना पोलिस नाईक नीलेश कोळी यांच्या हाताला झळ बसली.
मिळालेल्या माहितीनुसार, शेखर गायकवाड हा चालक म्हणून कामास आहे. तो घटस्फोटित आहे. चाकण येथे काम करत असताना इचलकरंजीतील एका घटस्फोटित महिलेशी त्याची ओळख झाली. त्यातून त्यांनी 6 महिन्यांपूर्वी आळंदी येथे विवाह केला होता. मात्र त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी इचलकरंजीतच काही दिवसांपासून राहात आहे. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये नोटरी पद्धतीने सोडचिठ्ठी झाल्याचेही नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. पत्नीचा नातेवाईकांकडून दुसरा विवाह आज करून दिला जात असल्याची माहिती मिळाल्याने शेखर गायकवाड इचलकरंजीत आला. त्याने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांसमोर कैफियत मांडली. पोलिसांनी पत्नीच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. दरम्यान ठाण्याच्या आवारात शेखर याने अचानक पेट्रोल ओतून घेवून पेटवून घेतले. त्याचा आरडाओरडा ऐकून काहींनी स्वत:चे कपडे काढून तर काहींनी चादर घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी इस्पितळात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर बनल्याने सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले.
पेटत्या अवस्थेत गायकवाड पोलिस ठाण्यात शिरल्याने त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांची पाचावर धारण बसली. पोलिसांचीही धावपळ उडाली. आयजीएममध्ये सासू, सासरे, पत्नी आल्याशिवाय उपचार घेणार नाही, असा आरडाओरडा तो करीत होता. उपचार करताना रुग्णालय कर्मचार्यांचीही तारेवरची कसरत झाली. यापूर्वीही गायकवाड याने नातेवाईकांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर पुणे परिसरात पत्नीला मारहाणीसह अन्य गुन्हे दाखल आहेत.