जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना राज्यात सर्वत्र बाप्पांचे जल्लोषात आगमन होत असतांना दुसरीकडे जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चोपडा तालुक्यातील एका गावातील शेतात १२ वर्षीय मुलीला नेवून तिच्यावर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना ७ रोजी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या मुलीचा खून केल्यानंतर तिला घटना स्थळावरून ओढत नेऊन कापसाच्या शेतात संशयिताने विवस्त्र टाकून दिले आहे. या मयत मुलीसोबत असलेल्या तिच्या १० वर्षीय लहान बहिणीने गावात येऊन आरडाओरड केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी २५ वर्षीय संशियताला पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्याने घटनेची कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, विरवाडा येथे राहणाऱ्या दोन्ही बहिणी शेतात कामाला गेल्या होत्या. कामावरून मालापूरकडून विरवाडे येथील आदिवासी दोन्ही बहिणी घरी परत येत होत्या. या वेळी मयत १२ वर्षीय मुलीला २५ वर्षीय संशयित आरोपीने विरवाडा शिवारातील शेतात ओढून नेले. तेथे तिच्यावर त्याने अत्याचार केला. त्यानंतर तिची दगडाने ठेचून निघृण हत्या केल्याची घटना ७ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. तर हत्येनंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला विवख घटना स्थळावरून १०० फूट ओढत नेत कापसाच्या शेतात फेकून दिल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जितेंद्र वल्टे यांच्यासह शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोलीस ठाण मांडून होते. या वेळी लोकनियुक्त सरपंच विशाल म्हाळके, पोलीस पाटील महारू कोळी व ग्रामस्थही घटनास्थळी उपस्थित होते.
संशयित आरोपीने मयत मोठ्या बहिणीला शेतात ओढून नेल्याचे तिच्या सोबत असलेल्या १० वर्षीय लहान बहिणेने पाहिले. त्यानंतर ती विरवाडे गावात येऊन तिने आरडाओरड करुन घडलेली घटना ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर मुलीला घेऊन ग्रामस्थ त्या शेतातकडे निघाले. शोध घेतल्यानंतर घटनास्थळी पोहोचल्यावर ग्रामस्थांना अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवले. तर जळगाव येथील एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे विरवाडे ते आडगाव रस्त्यावर संशयिताला अटक करण्यात एलसीबीला यश आले आहे. रात्री उशिरापर्यंत त्याची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले होते.