जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२५
चोपडा तालुक्यातील लोणी गावात गोवंश कत्तलीच्या माहितीवरून गेलेल्या काही तरुणांवर स्थानिक कसाई लोकांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवार, ११ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर येथील कृष्णा भिल (१८) व योगेश महाराज कोळी (३५, रा. जळगाव) यांच्यासह काही तरुणांना लोणी गावात गोवंश कत्तलीचे कृत्य सुरू असल्याची माहिती मिळाली. यानंतर तेथील परिस्थितीची चौकशी करण्यासाठी ते लोणीकडे गेले. त्यांनी संबंधित प्रकाराला विरोध करण्याचा प्रयत्न केल्यावर काही स्थानिकांनी त्यांच्यासोबत शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.
हल्लेखोरांनी चॉपर, कोयते व लोखंडी दांड्यांनी वार करत कृष्णा भिल व योगेश कोळी यांना गंभीर दुखापत केली. विशेषतः योगेश कोळी यांच्या मांडीवर चॉपरने वार केल्याचे समजते. जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून पोलिसांनीही परिस्थितीचा आढावा घेत तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.




















