जळगाव मिरर | १८ सप्टेंबर २०२५
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असताना आता नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. खंडणीसाठी अकरा वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांचे अपहरण करून गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चनकापूर परिसरात उघडकीस आली. पोलिसांनी सूत्रधारासह तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे. जित युगराज सोनेकर (वय 11, रा. वार्ड क्रमांक 2, खापरखेडा) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. राहुल गौरीलाल पाल (वय 25) अरुण भारती (वय 25) आणि यश गिरीश वर्मा (वय 21 चनकापुर कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जित याचे वडील युगराज चाणकापूर यांचा फळभाजी विक्रीचा व्यवसाय असून पत्नी नीलिमा मोठा मुलगा राज आणि छोटा जित यांना घेऊन वेगळ्या खापरखेडा येथे राहत होत्या. आरोपी राहुल हा शेजारीच राहणारा असल्याने त्याला शेती विकून जित याच्या वडिलांना एक कोटी रुपये मिळाल्याची कुणकुण लागली आणि त्याने अपहरण करून 5 लाखांच्या खंडणीसाठी हा बेत आखला.
मात्र, जित ओळखत असल्याने आपली नावे सांगेल, या भीतीने त्यांनी त्याची हत्या केली. मुळात त्यांची शेती विकली नव्हती तर ते वडिलांची प्रकृती बघण्यासाठी गावी गेले होते. या घटनेत सोमवारी जित शाळेतून येत असताना त्याला रस्त्यात संधीच्या शोधात असलेल्या राहुल, यश आणि अरुण या तिघांनी कारने घरी सोडून देतो, असे म्हणत गाडीत घेतले. आधी कोराडी नंतर वारेगाव आणि नंतर मानेगाव परिसरात फिरवले. पारशिवनी पुलाजवळ रात्री साडेदहाच्या सुमारास जित याची गळा दाबून हत्या केली आणि एका पोत्यात भरले.
राहुलच्या घरामागे एका पडक्या इमारतीत ते पोते ठेवले. दोन दिवसानंतर दुर्गंधी येऊ लागली. अखेर पुन्हा तो मृतदेह बुधवारी दुसऱ्या निर्जन ठिकाणी झुडुपात लपवून ठेवला आणि घरी परत आले. मात्र, एक श्वान प्रेमी तिथून जात असताना कुत्रा का भुंकतो, म्हणून त्याने आत डोकावून बघितल्यावर या चिमुकल्याचा हत्येचा उलगडा झाला. लागलीच पोलिसांनी सूत्रे फिरवत आरोपींच्या मुसक्या बांधल्या.