
जळगाव मिरर | २४ मे २०२५
जगभरात २०१९ मध्ये कोरोना आजाराने थैमान घातले होते आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असताना ठाणे जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 21 वर्षीय तरुणाचा आज पहाटे 6 वाजता कोरोनामुळे मृत्यू झाला. हा तरुण मुंब्रा येथील रहिवासी असून, ठाणे जिल्ह्यातील यंदाचा कोरोनाचा हा पहिला बळी ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाला 22 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली, जी 23 मे रोजी पॉझिटिव्ह आली. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने आज पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईतही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 23 मे रोजी राज्यात 45 नव्या रुग्णांची नोंद झाली, यापैकी 35 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. सध्या मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 185 वर पोहोचली आहे. मे महिन्यापासून रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आणि लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात आणि देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने प्रशासनाने नागरिकांना मास्क वापरण्याचा आणि सार्वजनिक ठिकाणी योग्य खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, लक्षणे दिसल्यास तात्काळ चाचणी करून उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.या घटनेमुळे ठाणे आणि मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.