जळगाव मिरर | ११ जुलै २०२५
यावल पुतण्याच्या हॉटेलवरून घरी परत येण्यासाठी निघालेल्या रेल्वे कर्मचारी प्रमोद बाविस्कर यांच्यावर दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी गोळीबार केल्याची घटना गुरुवारी रात्री १० ते १०.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत बाविस्कर यांच्या छातीला व मानेला गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर जळगाव येथील एका खासगी रुग्णायात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील चंदुआण्णा नगरमधील प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय ४०) यांच्या पुतण्याचे यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्याजवळ रायबा नावाचे हॉटेल आहे. दरम्यान, प्रमोद बाविस्कर हे १० जुलैला पुतण्याच्या मनुदेवी फाट्याजवळील हॉटेलवर गेले होते. दरम्यान, प्रमोद बाविस्कर हे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मनुदेवी फाट्याजवळील हॉटेल रायबा बाहेर परत जळगाव येथे येण्यासाठी कारमध्ये बसले होते. त्याच वेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या हॉटेलवर आले आणि त्यांनी हॉटेल सुरू करून दारू देण्याची मागणी केली. तर बाविस्कर यांनी हॉटेल बंद झाल्याचे सांगत त्यांना दुसऱ्या हॉटेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. यावर संतापलेल्या हल्लेखोरांनी थेट प्रमोद बाविस्कर यांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात प्रमोद बाविस्कर यांच्या मानेला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. तर या गोळीबार केल्यानंतर हे हल्लेखोर तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला.
हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या बाविस्कर यांच्या मुलासह इतर कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी तातडीने जखमी प्रमोद बाविस्कर यांना जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच यावल येथील पो.नि. रंगनाथ धारबळे तसेच चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन तत्काळ तपासाला गती दिली.
