जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२५
शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात एक मोठी बातमी आहे. एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याची एक बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात धमकीचा ई-मेल आल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाहीतर मुंबईतल्या जवळपास 7 ते 8 पोलीस ठाणे आणि इतर विभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे. पोलिसांकडून ई-मेल पाठणाऱ्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात आलेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून या मेलचा अधिकचा तपास सुरू आहे. मंत्रालय पोलीस, जेजे मार्ग पोलीस ठाण्याला देखील हा धमकीचा मेल मिळाला आहे.
या आधी एकनाथ शिंदेंना धमकी देणारा हितेश धेंडे हा ठाण्यातील श्रीनगर वारली वाडा या परिसरात राहतो. त्याने आपल्या पोस्टमध्ये रात्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर गोळीबार करणार, असे म्हटले होते. तसेच शिवीगाळही केली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या हितेश धेंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने श्रीनगर पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले होते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.