जळगाव मिरर | ३१ जुलै २०२५
यावल : शहरातील बोरावल गेट भागातील एका कुटुंबाने साखरपुड्याचे आमंत्रण न दिल्याच्या कारणावरून ७ जणांनी प्रौढाशी वाद घातला तर महिलेचा विनयभंग करुन ५ जणांना मारहाण केली होती. यातील एक जण गंभीर झाला होता. या जखमी प्रौढाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात ७जणांविरुद्ध दाखल गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्याची कार्यवाही पोलिसांकडून केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरात बोरावल गेट भागातील रहिवासी एका कुटुंबातील मुलीचा साखरपुडा तालुक्यातील कोरपावली येथे पार पडला. तर, या साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे आमत्रंण दिले नाही, या कारणावरून २ जूनला रात्री आरीफ नजीर पटेल (वय ४३) यांना सशयित मुसा मजीद पटेल, आरिफ उर्फ पप्पू मुसा पटेल, हुसेन मुसा पटेल, मीना मुसा पटेल, जावेद मुनाफ पटेल, अनिसा जावेद पटेल व यास्मिन जावेद पटेल यांनी लाठ्या-काठयानी त्यांच्या घरात जावून त्यांच्या डोक्यावर वार करुन गंभीर जखमी केले होते. तर एका महिलेचा विनयभंग केला होता. या हाणामारीत या कुटुंबातील महिला व पुरूष असे पाच जण जखमी झाले होते. दरम्यान, गंभीर जखमी आरीफ पटेल हे कोमात गेले होते. त्यांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
