
जळगाव मिरर | २४ सप्टेंबर २०२५
शहरातील दुध फेडरेशन रोड लगत असलेल्या खडके चाळ परिसरात मागील काही दिवसांपासून गटारींची सफाई करण्यात येत आहे. मात्र, गटारीतून बाहेर काढलेली घाण रस्त्यावर तशीच टाकून दिल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.
गटारीतील चिखल, प्लास्टिक कचरा, अर्धवट कुजलेला जैविक कचरा रस्त्यावर पडल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या कचऱ्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले असून मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. “गटारीतील घाण बाहेर काढून तशीच रस्त्यावर टाकली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून तीच घाण इथे पडून आहे.
सफाईची कामे सुरु ठेवली असली तरी त्यानंतरची प्रक्रिया – कचरा उचलणे आणि निर्जंतुकीकरण करणे पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका केवळ औपचारिकता म्हणून सफाई करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आजार पसरल्यानंतर उपाययोजना करून काही उपयोग नाही. वेळेत लक्ष दिलं नाही, तर नागरिक रस्त्यावर उतरतील, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहे.





















