जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२४
उद्धव ठाकरे, शरद पवार म्हणतात की, आमचा पक्ष भाजपमुळे फुटला. मात्र, मी त्यांना सांगू इच्छितो की, त्यांचा पक्ष आम्ही फोडला नाही तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष पुत्रमोहामुळे आणि शरद पवार यांचा पक्ष त्यांच्या मुलीच्या प्रेमामुळे फुटला आहे, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ रविवारी साकोली तालुक्यातील सेंदूरवाफा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
शाह पुढे म्हणाले की, परिवारवादी पक्षांनी केवळ स्वतःचा आणि कुटुंबाचा फायदा पाहिला आहे. आता महाराष्ट्रात अर्धी झालेली शिवसेना व अर्धी झालेली राष्ट्रवादीबरोबर काँग्रेस देखील अर्धा झालेला पक्ष बनला आहे. त्यामुळे अर्धे झालेले राजकीय पक्ष या राज्याचा विकास करू शकत नाहीत. मोदींच्या नेतृत्वातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी पक्षच या राज्याचा विकास करू शकेल. शरद पवार जेव्हा केंद्रात कृषीमंत्री होते, तेव्हा त्यांनी महाराष्ट्रासाठी काय दिले? काहीही दिले नाही. त्यांनी दहा वर्षांत महाराष्ट्रात दिले असेल त्याच्या कितीतरी पट मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राला निधी दिला गेला.
शरद पवार यांनी दहा वर्षांत एक लाख ९१ हजार कोटींचा निधी दिला, तर पंतप्रधान मोदींच्या दहा वर्षांच्या काळात सात लाख १५ हजार कोटींचा निधी दिला. रस्त्यांच्या विकासासाठी दोन हजार कोटींचा निधी दिला. सर्वच क्षेत्रात आवश्यक निधी दिला. त्यामुळे या देशाचा आणि राज्याचा विकास मोदींच्या नेतृत्वाखाली होईल, असा विश्वास जनतेला देखील आलेला आहे, असे म्हणत अमित शाह यांनी काँग्रेससह शरद पवारांवर हल्लाबोल केला.