जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२६
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमीच तिच्या अभिनयामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर ती अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी बनली. त्यानंतर अनेक चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रार्थनाने तिच्या आलिशान लाईफस्टाईलबद्दल आणि कमाईबद्दल स्पष्टपणे भाष्य केले आहे. अभिनेत्री म्हणून चांगले पैसे मिळतात का, तसेच लक्झरियस जीवनशैलीसाठी किती खर्च येतो, याबाबत तिने मनमोकळेपणाने सांगितले.
“हो, पैसे मिळतात… भरपूर मिळतात. माझं आयुष्य लक्झरियस आहे. कदाचित माझ्या नवऱ्यामुळे असेल. पण शेवटी ते आपल्या गरजांवर अवलंबून असतं,” असे प्रार्थनाने सांगितले.
ती पुढे म्हणाली, “मला इंडस्ट्रीत १५ वर्षे झाली, पण माझ्या नावावर अजून घर नाही. माझ्या नावावर फक्त कार आहे. मला घर कधी फार महत्त्वाचं वाटलं नाही. इतर गोष्टी महत्त्वाच्या होत्या, त्यामुळे मी त्यावर लक्ष दिलं आणि त्यावर पैसा खर्च केला.”
प्रार्थनाने हेही स्पष्ट केले की, अभिनेत्री म्हणून लाईफस्टाईल मेंटेन करणे खूप खर्चिक असते. “जेवढं मी कमावते, ते जवळपास सगळं मी लाईफस्टाईलवर खर्च करते. नखांपासून ते हेअर ड्रेसर, स्किन केअरपर्यंत सगळ्यावर खूप खर्च होतो. म्हणूनच अभिनेत्री एवढं कमावतात,” असे ती म्हणाली. तिच्या या स्पष्टवक्तेपणामुळे पुन्हा एकदा प्रार्थना बेहेरे चर्चेत आली आहे. अभिनेत्रींच्या ग्लॅमरस आयुष्यामागील खर्चाचे वास्तव तिने मोकळेपणाने मांडल्याने चाहत्यांमध्येही याबाबत चर्चा रंगली आहे.





















