जळगाव मिरर | १७ सप्टेंबर २०२५
राज्यातील मुंबईमधील दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील मीनाताई ठाकरे (शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी) यांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांनी रंग फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने पुतळ्याची सफाई करण्यात आली. तसेच आरोपीचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला जाणार आहे. शिवाजी पार्क परिसरात शिवसैनिकांनी गर्दी केली असल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार महेश सावंत आणि खासदार अनिल देसाई घटनास्थळी दाखल झाले. यावेळी देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. ते म्हणाले, “काही समाजकंटकांनी पुतळ्यावर रंग फेकला आहे. कदाचित या भेकडाच्या अवलादींवर संस्कार झालेले नसतील. पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत. अशा घटना पाहून पोलीस यंत्रणा काय करत आहे? सरकार काय करतंय? असे प्रश्न पडतात. सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अयशस्वी ठरत असल्याचं दिसत आहे.” दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांनीही आक्रमक भूमिका घेतली.