जळगाव मिरर | २२ मार्च २०२४
राज्यातील राजकीय वातावरण लोकसभा निवडणुकीवरून तापलं असताना शिर्डीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी दि.२१ रात्री उशीरा मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडलाय.
भाऊसाहेब कांबळे यांनी २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश करत श्रीरामपूर विधानसभेचं तिकीट मिळवलं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी आशा भाऊसाहेब कांबळे यांना होती.
मात्र, उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात दिल्याने कांबळे नाराज झाले होते. ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. गुरुवारी कांबळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह थेट मुंबई गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर अधिकृतपणे त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना माजी आमदाराने शिंदे गटात प्रवेश केल्याने शिर्डीत ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे.