जळगाव मिरर | ३ ऑगस्ट २०२५
घरी कोणीही नसताना राहत्या घरात वैभव रवींद्र ठाकूर (वय १५ रा. रायपूर, ता. जळगाव) या इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना दि. १ ऑगस्ट रोजी रात्री रायपूर कुसुंबा येथे घडली. आतून बंद असलेला दरवाजा भावाने तोडला, त्या वेळी वैभव गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील रायपूर येथील वैभव ठाकूर हा कुसुंबा येथील श्री स्वामी समर्थ विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता. दि. १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी तो घरी एकटाच असताना त्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. त्याची आई घरी आली त्या वेळी दरवाजा आतून लावलेला होता. त्यामुळे त्यांनी लहान मुलाला बोलविले. त्याने इतरांच्या सहकार्याने दरवाजा तोडला तर वैभव गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैभवने आत्महत्या का केली, याचे कारण समोर आले नाही. अभ्यास असो की अन्य कोणत्याही तणावात तो नव्हता, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.





















