
जळगाव मिरर | २९ मार्च २०२६
चाळीसगाव तालुक्यातील शिवापुर तांडा येथे पती-पत्नीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळाळले माहितीनुसार, भगवान पोपट जाधव (वय ३८) आणि त्यांची पत्नी आशाबाई भगवान जाधव (वय २७, रा. शिवापुर तांडा, ता. चाळीसगाव) अशी मृतांची नावे आहेत. दोघांना मृत अवस्थेत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना २८ मार्च रोजी सकाळी सुमारे ९.४५ वाजण्यापूर्वी घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दोघांचाही मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अनुक्रमे अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक १९/२०२६ व २०/२०२६ (बीएनएसएस कलम १९४) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व आवश्यक ती प्राथमिक कार्यवाही पूर्ण करून अहवाल न्यायालयाकडे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार प्रविण सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या दुहेरी मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, एकाच कुटुंबातील पती-पत्नीचा एकाच वेळी झालेला मृत्यू संशयास्पद मानला जात असून, पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार प्रविण संगिले व हवालदार अकरम बेग करत असून, लवकरच सत्य परिस्थिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





















