जळगाव मिरर | २३ जुलै २०२५
राज्यातील जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भोकरदन येथील गणपती विद्यालय निवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात, किरकोळ वादातून 8 वर्षांच्या बालवीर पवार या विद्यार्थ्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, ही क्रूर कृत्य वसतिगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली.
प्राथमिक माहितीनुसार, खेळताना झालेल्या किरकोळ वादातून या दोन अल्पवयीन मुलांनी दोरीने बालवीरचा गळा आवळून त्याचा जीव घेतला. 8 आणि 13 वर्षे वय असलेल्या या दोन विधी संघर्ष बालकांना भोकरदन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली आहे.
या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, मृत बालवीरच्या कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व तपास सुरू केला. दरम्यान, ही आश्रमशाळा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर शाळेतील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, बालकांच्या मानसिकतेपासून ते शाळा प्रशासनाच्या जबाबदारीपर्यंत अनेक अंगांनी चौकशी केली जात आहे.
