जळगाव मिरर । १९ जानेवारी २०२६
अमळनेर शहरातील ढेकू रोड परिसरात राहणारे खाजगी शाळेचे शिक्षक सुरेश सिताराम सोये (वय अंदाजे ४५) यांचा रविवारी (दि.१८) सकाळी १० वाजेच्या सुमारास रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना चांदणी कुहे गावाजवळील सती माता मंदिर परिसरात घडली. या घटनेमुळे ढेकू रोड परिसरासह अमळनेर शहरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश सोये हे न्यु इंग्लिश स्कूल, नांदेड येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी सौ. प्रमिला मोरे या जि. प. शाळा, निपाणे (ता. एरंडोल) येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी सुरेश सोये हे घरातून अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर ते कोकणात सापडल्याने नातेवाइकांनी त्यांना तेथून परत आणले होते. दोन ते तीन दिवस घरातच थांबल्यानंतर रविवारी सकाळी ते घरातून बाहेर पडले. त्यानंतर सती माता मंदिराजवळ हावडा–अहमदाबाद रेल्वेगाडीखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी व अंगठी यांच्या आधारे त्यांची ओळख पटली. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मूळचे चोपडा तालुक्यातील पंचक येथील रहिवासी असलेले सुरेश सोये यांच्यावर रात्री उशिरा अमळनेर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार असून ते जैतपीर येथील ग्रामपंचायत अधिकारी अभय विठ्ठल मोरे यांचे मेव्हणे होते. पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.




















