जळगाव मिरर | १४ एप्रिल २०२५
राज्यात प्रत्येक सणाच्या वेळी डीजेच्या दणदणाटात नाचणे हे सर्वत्रच मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. मात्र डीजेचा आवाज जिवावर देखिल बेतू शकते. नाशिक येथे अशीच एक घटना घडली असून डीजेच्या आवाजामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नितीन फकिरा रणशिंगे, वय २३ असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी नाशिकच्या फुले नगर परिसरात डीजे लावण्यात आला होता. नितीन हा तरुण परिसरात आला असता डीजेच्या आवाजाने त्याच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव झाला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.
नितीन रणशिंगे या तरुणाचा मृत्यू हा डीजेच्या आवाजाने झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याचसोबत या तरुणाला इतरही काही आजार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.