जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२५
आज श्री रामनवमीचा उत्सव संपूर्ण भारतवर्षात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दुपारी १२ वाजता जन्मोत्सवाचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. जगभरातून आलेल्या भाविकांनी आज आयोध्येतील राम मंदिरात सूर्य तिलक होतानाचे दृष्य आपल्या डोळ्यात साठवले. याआधी आज सकाळी ९:३० वाजता भगवान श्री रामाची विशेष अभिषेक पूजा संपन्न झाली. ही पूजा सुमारे तासभर सुरू होती. यानंतर श्री रामाचा भव्य श्रृंगार करण्यात आला. सूर्याभिषेकाचे प्रसारण सगळ्या जगाने पाहिले. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
आज श्री राम नवमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील सर्व मंदिरे विविधरंगी फुलांनी सजवण्यात आली होती. आज श्री रामाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल झाले आहेत. सकाळी ९:३० वाजता जन्मात्सवाचा कार्यक्रम सुरू झाला. सर्वात आधी रामलल्लाचा अभिषेक विधी संपन्न झाला.
राम मंदिरातील हा दुसरा जन्मोत्सव संपन्न होत आहे. सकाळी १०:३० वाजता एक तासभर भगवान श्री रामाचा श्रृंगार करण्यात आला. त्यानंतर नैवेद्य दाखवण्यात आला. दुपारी १२ वाजता राम लल्लाचा जन्मोत्सव सोहळा सुरू झाला. मंदिरात पूजा-आरती आणि सूर्यतिलक संपन्न झाला. यावेळी सूर्याची किरणे राम लल्लाच्या मुर्तीवर कपाळावरील टीळ्यावर येउन स्थिरावली आणि सूर्यतिलक झाला. याआधी शनिवारी सूर्य तिलकची ट्रायल घेण्यात आली होती. जन्मोत्सवाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. दुपारी १२ वाजता रघुकुलात रामलल्लाच्या जन्माने भक्तांमध्ये आनंदाचे आणि भक्तीभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
