जळगाव मिरर | १३ एप्रिल २०२४
गेल्या अनेक दिवसापासून शरद पवार गटातर्फे रावेर लोकसभा मतदार संघात अनेक नावे चर्चेत येत होती पण अचानक उद्योजक श्रीराम पाटलांनी पक्षात प्रवेश करीत उमेदवारी मिळविल्यानंतर रावेर लोकसभा मतदार संघात शरद पवार गटात मोठी नाराजी अनेक पदाधिकाऱ्यांची पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील यांनी गुढीपाडव्याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर एका दिवसापूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे रावेर लोकसभा मतदार संघात राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान, एका दिवसापूर्वी पक्षात आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आणि अनेक वर्षांपासून पक्षाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला डावलण्यात आले, असा आरोप जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. पक्षाच्या या निर्णयाविरोधात शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती आहे. यामुळे जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का बसणार आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षातील नाराजी नाट्य समोर आले आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न देता ऐनवेळी पक्षात आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने भुसावळ वरणगाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. तर त्यातच उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संतोष चौधरी हे देखील नाराज असून संतोष चौधरी हे अपक्ष उमेदवारी दाखल करून बंड करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षातर्फे दावेदार असणारे उद्योजक श्रीराम पाटील यांनी दोन महिन्यांत भाजपसोडून शरद पवार गटाची वाट धरली. भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटात प्रवेश केलेल्या श्रीराम पाटील यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर भुसावळ, रावेर, वरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील शेकडो पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.