जळगावात सरकारी रुग्णालयामध्ये नेव्हीगेशन सिस्टीम ठरतेय रुग्णांसाठी महत्वाची
जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२५
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील कान नाक घसा विभागात अत्याधुनिक “इमेज गाइडेड नेव्हिगेशन सिस्टम” या तंत्रज्ञानाचा नियमितपणे वापर होत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने नाकाशी संबंधित शस्त्रक्रिया पार पडण्यास मदत होत आहे.
“फंक्शनल एंडोस्कोपिक सायनस सर्जरी” ही दीर्घकाळ चालणाऱ्या सायनुसायटिस आणि नाकातील पॉलीप्स यांसारख्या सायनस-संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी केली जाणारी एक किमान-आक्रमक शस्त्रक्रिया आहे. अधिक अचूक, सुरक्षित आणि परिणामकारक बनली आहे. जटिल व नाजूक सायनस शस्त्रक्रियांमध्ये हे तंत्रज्ञान विभागासाठी महत्त्वाचे साधन ठरत आहे.हे आधुनिक नेव्हिगेशन सिस्टम शस्त्रक्रियेच्या वेळी रिअल-टाइम त्रिमितीय मार्गदर्शन प्रदान करते, ज्यामुळे अत्यंत नाजूक रचनांची अचूक ओळख करून शस्त्रक्रिया अधिक सुरक्षितपणे पार पाडणे शक्य होते.
विभागप्रमुख डॉ. राजेश्री चौरपगार व सहयोगी प्रा. डॉ. अक्षय सरोदे यांनी सांगितले की, रुग्णालयात नेव्हिगेशन सिस्टमच्या वापरामुळे शस्त्रक्रियेचे यशाचे प्रमाण वाढले, जोखीम कमी झाली आणि रुग्णसुरक्षा अधिक बळकट झाली आहे. “इमेज गाइडेड नेव्हिगेशन सिस्टम” म्हणजे हे तंत्रज्ञान विशेषतः अशा रुग्णांसाठी वापरले जाते ज्यांची सायनस रचना गुंतागुंतीची आहे किंवा ज्यांची यापूर्वी सायनस शस्त्रक्रिया झाली आहे.तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आधुनिक शल्यतंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळत असल्याने त्यांचे कौशल्य अधिक विकसित होत आहे. या तांत्रिक प्रगतीसाठी कान नाक घसा सर्जन तथा अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ महत्त्वाचे ठरले आहे. या सुविधेमुळे जळगाव तसेच उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना जागतिक दर्जाची एंडोस्कोपिक सायनस शस्त्रक्रिया सरकारी रुग्णालयातच महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपलब्ध होत आहे.





















