जळगाव मिरर | संदीप महाले
गेल्या अनेक महिन्यांपासून जळगाव शहर नेहमीच चोरी, मारामारी, खंडणी, खुनासह गुटखामाफिया वाळूमाफिया यांच्या घटनेने नेहमीच चर्चेत असतो मात्र नुकतेच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी काढलेल्या एका आदेशामुळे जळगाव शहरातील अल्पवयीन मुलं दुचाकी हाती घेत नसल्याने पोलीस अधीक्षकांचे जळगावकर नागरिकांतर्फे कौतुक होत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून जळगाव शहरातील गुन्हेगारी नेहमीच उफाळून आलेली आहे. त्यावर नेहमीच पोलीस प्रशासनामार्फत कारवाई देखील करण्यात येत असते मात्र कारवाई झाल्यावर काही दिवसांनी पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत असते. मात्र नुकतेच पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी वाहतूक शाखेला अल्पवयीन दुचाकीस्वार यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश काढल्यानंतर पहिल्याच दिवशी शेकडो पालकांना दंड भरावा लागला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अनेक पालकांनी आपल्या मुलांना दुचाकी दिली नाही तर अल्पवयीन मुलांनी देखील दुचाकी हातात घेण्यास नकार दिला. त्यामुळे जळगाव शहरात काही प्रमाणात का होईना अपघात नियंत्रण होतील यासह वाहतूक कोंडी देखील थांबणार आहे. त्यामुळे जळगाव शहरातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांचे कौतुक करीत त्यांचा सत्कार देखील केला आहे. मात्र ही कारवाई अशीच नेहमी देखील सुरू रहावी अशी देखील भावना जळगावकर नागरिक सध्या व्यक्त करू लागला आहे.
पोलीस अधीक्षक साहेब जरा इकडेही बघाच…
जळगाव शहरातील अनेक शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेस परिसरात अनेक ठिकाणी हॉटेल व कॅफेच्या नावाखाली तरुण-तरुणी निवांत वेळ शोधून या ठिकाणी आपला वेळ घालवत असतात. यासोबत या ठिकाणी काही तरुण-तरुणी अश्लील कृत्य देखील करत असल्याचे बोलले जात आहे. यासह अनेक शाळा महाविद्यालय व कोचिंग क्लासेस परिसरातील पान सेंटर, दूध डेअरी या ठिकाणी सर्रास गुटखा, पानमसाला व सिगारेट विक्री केली जात आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलं या व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी साहेब जरा या परिसरात देखील आपण विशेष लक्ष द्यावे जेणेकरून अल्पवयीन मुलं व्यसनाच्या आहारी जाणार नाही याची देखील काळजी आपण घ्यावी व त्या दुकानदार व हॉटेलधारकांना देखील तंबी द्यावी हीच विनंती…