
जळगाव मिरर | २१ एप्रिल २०२५
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका सुरु असतांना आता अमळनेर तालुक्यातील एका गावात शेतात जाणाऱ्या दाम्पत्याच्या मोटरसायकलला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने धडक देऊन फरफटत नेले. या अपघातात महिला ठार झाली असून तिच्या पतीची प्रकृती चिंताजनक आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील मुरलीधर रामचंद्र पाटील व लता मुरलीधर पाटील हे दोघे मोटरसायकलवर शेतात दहिवदकडे जाताना समोरून चोपड्याकडून अमळनेरकडे येणाऱ्या यावलच्या बस क्रमांक एम.एच.२० बी.एल २६५६ ने जोरदार धडक देऊन मोटरसायकलसह पती पत्नीला तब्बल १०० मीटर फरफटत नेले. मोटरसायकल बस खाली आल्याने नागरिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढण्यात आले.
लताबाई गंभीर जखमी झाली होती. १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. इम्रान कुरेशी यांनी दोघांवर तातडीने उपचार करून ग्रामीण रुग्णालयात आणले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुळ्याला हलवण्यात आले असता महिलेचा मृत्यू झाला तर मुरलीधर यांनाही धुळे येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ व हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व पुढील तपास करीत आहेत.




















