
जळगाव मिरर | ४ एप्रिल २०२६
शहरातील अयोध्यानगर परिसरात भरधाव डंपरने बुलेटस्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना घडली असून, या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक अरुण राऊत (वय ३८, रा. खोटेनगर) हे ३ एप्रिल रोजी पहाटे साडेदोन वाजेच्या सुमारास आपल्या बुलेट (क्रमांक एमएच-१९, डीए-२१३७) दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी जात होते. अयोध्यानगर परिसरातील माधुरी बेकर्स समोर समोरून येणाऱ्या एमएच-१९, झेड-४१०० क्रमांकाच्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात राऊत यांच्या दोन्ही पायांना, हाताला तसेच शरीराच्या इतर भागांवर गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर संबंधित डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार संजीव मोरे करीत असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे. शहरात वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांकडून वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली जात आहे.






















