जळगाव मिरर | १५ ऑक्टोबर २०२४
शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील बिजासनी मातेचे दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबाच्या दुचाकीला शुक्रवारी अपघात झाला. यात जखमी झालेल्या नेहल मनोज शिंदे (वय २) आणि तिची आई हेमांगी मनोज शिंदे (वय २८, दोघी रा. चोपडा) यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील मनोज शिंदे हे पत्नी हेमांगी व मुलगी नेहल यांच्यासोबत एमएच १९ बीएम ५९९ क्रमांकाच्या दुचाकीने शुक्रवारी शिरपूर तालुक्यातील बिजासनी मातेच्या दर्शनासाठी गेले होते. ते सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चोपड्याकडे परत येत असताना पळासनेर गावाजवळील रस्त्याच्या उतारावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात मायलेकींच्या पायावरून वाहन गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. महामार्ग रुग्णवाहिकेने जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार घेत असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला. पळासनेर येथील मृत्युंजय देवदूत, लकी जाधव, विकास जगदेव, नीलेश दुबे, सांगवी पोलिस ठाण्याचे कर्मचारी व महामार्गावरील वाहतूक पोलिस यांनी घटनास्थळी मदतकार्य केले.