
जळगाव मिरर | ४ मे २०२६
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तब्बल 2 लाख 18 हजार 930 मताधिक्याने त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. या निकालामुळे बारामतीतील पवार कुटुंबाचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान झाले होते. विरोधी महाविकास आघाडीने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शविल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, 22 अपक्ष उमेदवारांनी अर्ज कायम ठेवल्याने प्रत्यक्ष निवडणूक पार पडली. निकालात सर्व अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून, अनेक उमेदवारांना शंभर मतांचाही टप्पा गाठता आला नाही.
मतमोजणीदरम्यानच सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली होती. 20 व्या फेरीअखेरच त्यांनी 1 लाख 89 हजार मतांची आघाडी मिळवत 2019 मध्ये अजित पवार यांनी मिळवलेल्या 1 लाख 65 हजार मताधिक्याचा विक्रम मोडला. अंतिम फेरीअखेर त्यांनी ही आघाडी वाढवत थेट 2 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला.
बारामती मतदारसंघात अजित पवार यांचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. 2019 मध्ये त्यांनी 1 लाख 65 हजार 265 मताधिक्याने विजय मिळवला होता, तर 2014 आणि 2009 च्या निवडणुकांमध्येही त्यांनी मोठ्या फरकाने बाजी मारली होती. यंदाच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी त्या सर्व विक्रमांना मागे टाकत नवा इतिहास रचला आहे.
या निवडणुकीत एकूण 2 लाख 23 हजार 705 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. करुणा मुंडे, अभिनेते अभिजित बिचकुले यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना अत्यल्प मते मिळाल्याने त्यांचा पूर्णपणे पराभव झाला.
विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांचे आभार मानत हा विजय जनतेच्या विश्वासाचा असल्याचे सांगितले. त्यांनी अजित पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत हा विजय त्यांच्या कार्याला दिलेली आदरांजली असल्याचे नमूद केले. तसेच बारामतीच्या विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या निकालामुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली असून, बारामतीतील हा विजय आगामी राजकीय समीकरणांवरही प्रभाव टाकणार असल्याचे मानले जात आहे.




















