
जळगाव मिरर | ९ मे २०२६
गेल्या काही दिवसांपासून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात सुरू असलेल्या अंतर्गत धुसफुशीला अखेर निर्णायक वळण मिळाले आहे. सभापती सुनिल महाजन यांच्या विरोधात १३ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर, अविश्वास चाचणीपूर्वीच महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दि. २७ एप्रिल रोजी बाजार समितीतील तब्बल १३ संचालकांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सुनिल महाजन यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. सभापती म्हणून महाजन यांचे संचालक मंडळाशी असलेले वर्तन बेजबाबदार व अकार्यक्षम असल्याचा ठपका संचालकांनी ठेवत त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली होती.
दरम्यान, अविश्वास प्रस्तावाच्या हालचाली सुरू असतानाच सुनिल महाजन यांनी राजकीय हालचालींना वेग दिला होता. त्यांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेत आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपविल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर अखेर गुरुवारी (दि. ८ मे) त्यांनी अधिकृतपणे उपनिबंधक कार्यालयाकडे सभापती पदाचा राजीनामा सादर केला.
अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याऐवजी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने बाजार समितीच्या राजकारणात मोठी कलाटणी मिळाली आहे. आता नव्या सभापतीपदासाठी कोणाचे नाव पुढे येणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
सभापती पद रिक्त झाल्याने आता जिल्हा उपनिबंधकांकडून नव्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. पुढील आठवड्यात ही निवड प्रक्रिया पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, मागील निवड प्रक्रियेत ऐनवेळी राजकीय समीकरणे जुळवत सुनिल महाजन यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल करून बाजी मारली होती. त्यामुळे इच्छुक असलेल्या लकी टेलर यांना त्या वेळी पदापासून दूर राहावे लागले होते. यामुळे यंदाच्या निवडीत कोणाला संधी मिळणार आणि कोण नवीन समीकरणे जुळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





















