जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२५
शहरातील कोल्हे नगरातील मध्यरात्रीच्या गोळीबाराने खळबळ उडवून दिल्यानंतर अखेर दीपक लक्ष्मण तरटे (रा. रामेश्वर कॉलनी) याला रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून १५ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला असून न्यायालयाने त्याला दि. ९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दि. ७ ऑगस्ट रोजी कोल्हे नगर येथे सरला सपकाळे यांच्या घरी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. आरोपी दीपक तरटे हा सरला सपकाळे यांच्या पतीचा मित्र असून, त्याने अचानक गोळी झाडून घटनास्थळावरून पळ काढला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढत रामेश्वर कॉलनीत सापळा रचून त्याला अटक केली. आरोपीकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दीपक तरटे याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात आधीपासूनच ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या अटकेनंतर इतर गुन्ह्यांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
