जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२४
इव्हेंटच्या कामासाठी व्हीआयपी केटर्सची ऑर्डर फिक्स करण्यासाठी नाशिक येथील एक तरुणी जळगावात आली होती. तिला दुचाकीवरुन घेवून जात असलेल्या तरुणाला दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने थांबवित मारहाण केली. तसेच त्याच्यावर धारदार चॉपरसारख्या शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शेरा चौकात घडली. तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सम्राट कॉलनीत मोहित राजेश चव्हाण (वय २७) हा तरुण राहत असून त्याचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये कार्यक्रम असल्याने त्याठिकाणी व्हीआयपी केटर्सची आवश्यकता होती. त्यामुळे मोहित चव्हाण याने नाशिक येथील त्याच्या ओळखीमध्ये असलेल्या एका तरुणीसोबत संपर्क साधून केटर्स पुरविण्यास सांगितले होते. त्याचे बुकींग करण्यासाठी शनिवारी दुपारच्या सुमारास ती तरुणी जळगावात आली. यावेळी मुकेश हा त्या तरुणीला घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेला होता. तेथून तरुणीला सोबत घेवून तो एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये बुकींगसाठी जात होता. दरम्यान, त्या तरुणाच्या दुचाकीचा पाठलाग करीत असलेल्या दोन दुचाकीस्वारांनी त्या तरुणाला काशीनाथ चौफुलीजवळील चौकात थांबवित त्या तरुणीचे नातेवाईक जळगावात आले असून त्यांच्यासोबत बोलण्यासाठी त्याला शेरा चौकात घेवून गेले.शेरा चौकात आल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या दहा ते बारा जणांच्या टोळक्याने मुकेश याला तरुणीसोबत तुझा काय संबंध, तीला सोबत घेवून कुठे फिरतो आहे या संशयावरुन त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी लोखंडी रॉडसह व चॉपर सारख्या शस्त्राने मुकेशवर वार करुन त्याला गंभीर जखमी केले.
मोहितला मारहाण केल्यानंतर टोळके तेथून पसार झाले. मुकेशने घटनेची माहिती आपल्या भावासह मित्रांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तरुणाला टोळक्याकडून मारहाण केल्यानंतर त्या टोळक्याने त्या तरुणीला देखील मारहाण केली. दोघांना मारहाण होत असल्यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. दरम्यान, शांतता कमिटीच्या दोन सदस्य त्याठिकाणी आले, ते त्या मुलीला सोबत घेवून गेल्याची माहिती जखमीच्या भावाने दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखलचे काम सुरु होते.