नाशिक : वृत्तसंस्था
गेल्या अडीच वर्षांपासून कोरोना संसर्ग आजाराचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता कुठे दिलासा मिळत असताना स्वाइन फ्लूच्या आजाराने डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांचा आकडा शहरामध्ये ९४ च्या वर पोचला असून, ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, असे असले तरी स्वाइन फ्लूमुळे शहरातील मृतांची संख्या अवघी तीन असून, उर्वरित मृत ग्रामीण भागातील आहे.
जून महिन्यापासून स्वाइन फ्लूचे रुग्ण सातत्याने आढळत आहे. जून महिन्यात दोन जुलै महिन्यात २८ तर ऑगस्ट महिन्यात ६४ रुग्ण आढळून आले आहे. स्वाइन फ्लूमुळे उपनगर येथील एका महिलेचा मृत्यू झाला. राजूनगर येथील एका ६५ वर्षी व्यक्ती व राणेनगर मधील आणखी एका महिलेचा असे तीन मृत्यू नाशिक शहरात झाले. जिल्ह्यात स्वाइन फ्लूने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ११ नोंदविण्यात आली आहे. नाशिक ग्रामीणमधील मृतांचा यात समावेश आहे. नगर जिल्ह्यातील स्वाईन फ्ल्यू रुग्ण नाशिकमध्ये खाजगी उपचारासाठी दाखल झाला होता, तर पालघर जिल्ह्यातील आणखी एक व्यक्ती उपचारासाठी दाखल झाला त्यांचा मृत्यू नाशिक शहरात झाला आहे.