मुक्ताईनगर : प्रतिनिधी
‘खुला गगन मेरे लिये, सपनो की उडान भरने’, असे आपल्या सुमधूर आवाजात गायन करत तनिष्का रूले हिने संगीत क्षेत्रात दमदार पदार्पण केले आहे. प्राथमिक शिक्षक असलेल्या वडिलांनी लेखन केलेल्या व लेकीने गायलेल्या गीताचा प्रकाशन तथा प्रक्षेपण सोहळा नुकताच पार पडला.
मुक्ताईनगर येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक दीपध्वज कोसोदे तर प्रमुख पाहुणे म्हणून डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे, अधिव्याख्याता शैलेश पाटील, गटशिक्षणाधिकारी बळीराम धाडी, शिक्षण विस्तार अधिकारी राजू तडवी, मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील, संगीतकार सौरभ कुलकर्णी, संगीत शिक्षक समीर कुलकर्णी, साहित्यिक जयवंत बोदडे, संस्थेचे विश्वस्त एन.व्ही.चौधरी, वसंतराव तळेले, आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक नितीन पवार, आदर्श प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सरला पाटील यांच्यासह श्यामकांत रूले, सौ.तनुजा रूले व गायिका कु. तनिष्का रूले उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रोजेक्टरवर तनिष्काच्या ‘सपनो की उडान’ या गीताचे प्रक्षेपण करून लोकार्पण करण्यात आले. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून तनिष्का रूले हिच्या संगीत प्रवासाला शुभेच्छा दिल्या. गायिका कु. तनिष्का रूले हिने बालपणापासून गायनाची गोडी लागल्याने अभ्यासासोबत गायनाचा छंद जोपासला असल्याचे सांगून आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमधून नुकतीच दहावीची परीक्षा दिली असल्याने आपल्या विद्यालयातच हा कार्यक्रम व्हावा हा हेतू असल्याचे तिने नमूद केले. सोबतच ‘सपनो की उडान’ गीताचे आपल्या सुमधुर आवाजात सादरीकरण केले, तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा एकच जल्लोष केला आणि तनिष्काचे कौतुक केले. नाशिक येथील संगीतकार सौरभ कुलकर्णी व मुक्ताईनगर येथील संगीत विद्या मंदिरातील संगीत शिक्षक समीर कुलकर्णी यांचे तिला मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन भरत काळे सर यांनी तर आभार तनिष्काचे वडील श्यामकांत रूले यांनी मानले. कार्यक्रमाला आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थी, शिक्षक,नातेवाईक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गीतकार वडील तर मुलगी गायिका
मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील रहिवासी रूईखेडे येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत उपक्रमशील तथा आदर्श शिक्षक श्यामकांत रूले यांनी ‘सपनो की उडान’ या गीताचे लेखन केले असून त्यांची कन्या कु. तनिष्का रूले हिने हे गीत गायले आहे. गीताला एम. डी. सौरभ यांनी संगीत दिले असून आवाजाचे नियोजन शुभम जोशी यांनी केले आहे. सदरच्या गीताचे रेकॉर्डिंग फीदर टच स्टुडिओ येथे करण्यात आले आहे. हे गीत तनिष्का रूले ऑफिशियल या यूट्यूब चैनलवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.