जळगाव मिरर | १३ ऑक्टोबर २०२४
दुकानावर चहा करीत असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने अरविंद अमाला पांडे (४९, मूळ रा. उत्तरप्रदेश, ह.मु. जळगाव) या चहा विक्रेत्याचा मृत्यू झाला. अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने ते स्टोवर पडल्याने त्यांच्या मानेजवळ भाजून जखमी झाले. ही घटना शुक्रवारी ट्रान्सपोर्टनगर जवळ घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले अरविंद पांडे हे सध्या जळगावात राहत होते. फिरत्या चहा दुकानावर ते व्यवसाय करीत होते. शुक्रवारी याच फिरत्या चहाच्या दुकानावर ते चहा करण्यासाठी दूध गरम करण्यासाठी ठेवले होते. याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते पेटत्या स्टोवर पडले. त्यामुळे त्यांच्या मानेजवळ भाजले गेले. ही घटना लक्षात येताच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गफूर तडवी करीत आहेत.