जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२५
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडत असतांना आज शुक्रवारी सकाळी एरंडोल-कासोदा मार्गावर भीषण अपघात घडला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एरंडोल-भडगाव मार्गावरील (MH २० BL ३४०२) एस.टी. बस अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या नाल्यात पलटी झाली. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. इतर ३५ प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर काही वेळातच मदतकार्य सुरू करण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस दल, रुग्णवाहिका आणि एस.टी. महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमींना तत्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन पद्धतीने कामकाज राबवले असून, जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सध्या पोलीस अधिक तपास करत असून, प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती गोळा केली जात आहे.
