जळगाव मिरर | २ जानेवारी २०२४
देशभरात नव्या वर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले आहे. या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी भीषण अपघात देखील घडले आहे. शिरपूर – चोपडा रस्त्यावर वेगातील कार रस्त्याच्या खाली उलटल्याने झालेल्या अपघातात शिरपूर शहरातील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर-चोपडा रस्त्यालगत असलेल्या सूतगिरणीच्या मागील बाजूने ३१ डिसेंबरला रात्री कारने (एमएच १८, बीएक्स १९२०) प्रवीण शिवाजीराव पाटील ( रा. क्रांतीनगर) व प्रशांत राजेंद्र भदाणे (रा. मातोश्री कॉलनी, शिंगावे शिवार) येत होते. त्या वेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने उलटली. अपघातानंतर कार रात्रभर पडून होती. प्रवीण पाटील प्रशांत भदाणे दुसरीकडे प्रवीण पाटील व प्रशांत भदाणे घरी न आल्याने दोघांच्या कुटुंबीयातर्फे त्यांना मोबाइलवर संपर्क साधला जात होता.
पण संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. दोघांचा अपघात झाल्याचे पहाटे उघडकीस आले. दोघांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी दोघांना मृत घोषित करण्यात आले. दोघ युवक विवाहित होते. प्रवीण पाटील हॉटेल व्यावसायिक तर प्रशांत भदाणे ठेकेदार होते.