
जळगाव मिरर | २८ ऑक्टोबर २०२४
तालुक्यातील कानसवाडे गावातील बसस्थानक परिसरात बेकायदेशीरपणे तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित कृष्णा वासुदेव कोळी (वय २४) याच्यावर नशिराबाद पोलीसांनी शनिवारी कारवाई केली. त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कानसवाडे गावातील बसस्थानक आवारात संशयित कृष्णा कोळी हा तरूण बेकायदेशीरपणे तलवार घेवून दहशत माजवित असल्याची माहिती नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.सी. मनोरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने शनिवार दि. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता कारवाई करत संशयित कृष्णा कोळी याला अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर बिडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.