
जळगाव मिरर | २३ एप्रिल २०२५
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले यांची पत्नी आणि मुलासमोर निर्घृण हत्या करण्यात आली. हे दृश्य पाहणं त्या २० वर्षीय मुलासाठी अत्यंत वेदनादायक ठरलं. दहशतवाद्यांनी पोलिसी वेशात जंगलातील पठारावर पोहोचून पर्यटकांना धर्माच्या आधारावर निवडून पुरुषांना नग्न करून त्यांची हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील सुभाष रोडवरील विजयश्री सोसायटीत राहणारे संजय लेले (५०) हे आपल्या पत्नी कविता आणि मुलगा हर्षलसोबत सहकुटुंब पहलगामला गेले होते. त्यांच्यासोबत मित्र अतुल मोने आणि हेमंत जोशी यांच्या कुटुंबीयांचाही समावेश होता. मंगळवारी दुपारी बैसरन टेकड्यांवर पर्यटनाचा आनंद घेत असताना दहशतवाद्यांनी पोलिसी गणवेशात येऊन पर्यटकांना गटांमध्ये विभागले. पुरुषांना नग्न करून त्यांचा धर्म ओळखला गेला आणि त्यानंतर निर्दयपणे गोळ्या झाडल्या गेल्या. संजय लेले यांच्यावर त्यांच्या पत्नी आणि मुलासमोर गोळ्या झाडण्यात आल्या.
या घटनेचे वृत्त डोंबिवलीत पोहोचताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संजय लेले यांच्यासह हेमंत जोशी आणि अतुल मोने या तिघांचाही मृत्यू झाला आहे. त्यांच्या सोसायट्यांमध्ये शोकसभा, सांत्वनासाठी गर्दी, आणि उत्सवी कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. केडीएमसी, पोलीस, महसूल अधिकारी आणि राजकीय नेते मृतदेहांच्या आगमनापर्यंत आणि अंत्यविधीपर्यंत आवश्यक सहकार्य करत आहेत. वाहतूक पोलिसांनी अंतिम यात्रेसाठी स्वतंत्र नियोजन केले आहे.