जळगाव मिरर | २ मे २०२४
राज्यातील नाशिक जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात सिन्नर तालुक्यातील रामनगरमध्ये लहान बहिण भावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. धनश्री भंडकर (वय, ४ वर्ष) आणि आयुष्य रवींद्र भंडकर (वय, ५ वर्ष) अशी या बहिण- भावांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील रामनगरमध्ये धनश्री भंडकर आणि ५ वर्षाचा आयुष्य रवींद्र भंडकर या दोघा बहीण भावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय दोन्ही मुलं घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या ५-६ फूट छोट्याशा पाण्याच्या तलावात पडल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. मुलं खेळता खेळता पाण्यात पडली हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. मात्र नंतर तलावाजवळ लहान मुलांचा आरडाओरडा ऐकल्यानंतर गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली असता दोन्ही बहिण भाऊ पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले.
दरम्यान, ग्रामस्थांनी तातडीने मुलांना पाण्यातून बाहेर काढत जवळच्या खाजगी दवाखान्यात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने मुलांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच संपूर्ण गावावर सध्या शोककळा पसरली आहे.