जळगाव मिरर | १३ फेब्रुवारी २०२४
देशातील आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच राज्याचे राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करीत असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच कॉंग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी देखील कॉंग्रेसला राम राम करीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटप्रमुख उध्दव ठाकरे हे आजपासून दोन दिवसीय शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सोनई येथे उद्धव ठाकरेंची पहिली सभा पार पडली.
“आपला पक्ष चोरला, चिन्हं ठेवलं नाही. माझ्या हातात काही नाही, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. तरीही तुम्ही माझ्यावर प्रेम करत आहात. मी तुम्हाला विश्वास देऊ शकतो. गडाख आणि आपली आधी जवळीक नव्हती. २०१९ ला अपक्ष लढले, आमच्याकडे आले त्यांना मंत्री केलं, गद्दार तिकडे गेले असते, तर आज देखील तुम्ही मंत्री असतात, पण तुम्ही गेला नाही..” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“काल अशोकराव गेले. कालपर्यंत आपल्याशी बोलत होते, जागा वाटपाची चर्चा करत होते आणि आज अचानक तिकडे गेले. मोदी, फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्यावर काय आरोप केले, ती क्लिप संजय राऊत तुम्ही दाखवली नाही. केंद्रीय अर्थमंत्री यांनी काढलेल्या श्वेत पत्रिकेत आदर्श घोटाळ्याच नाव आहे. फडणवीस म्हणाले अशोक चव्हाण लीडर नाही डीलर आहे, मग आता कशाला घेतलं? अब्रू नाही तर घाबरु कशाला?अब्रूचे धिंडवडे निघालेत,” अशी टीकाही ठाकरेंनी केली.